अजित पवार बंडाच्या बातम्या, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले टाइमिंग

मुंबई : गेल्या तीन-चार दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कथित बंडाच्या बातम्या सुरू आहेत. या बातम्या कधीपासून सुरू झाल्या याचे टाइमिंग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गेल्यानंतरच अजित पवारांबाबत या बातम्यांना सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवारांना बदनाम करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही. भाजपनेही त्यांना संपर्क केला नाही. भाजपमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही. अजित पवार यांचे विरोधक अशा बातम्या तयार करत असतील तर त्यांची बदनामी कोण करत आहे हे त्यांनीच पाहावे. गेल्या 2 वर्षांपासून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे काम विरोधक करत नाहीत तर त्यांच्याच पक्षातील नेते करत आहेत. महाविकास आघाडीतच असे प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोटही बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे म्हणाले, जी बाब घडलेलीच नाही. त्याबाबत चुकीची माहिती देऊ नये. कल्पोकल्पित बातम्या देऊ नये. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गेल्यानंतरच अजित पवारांबाबत या बातम्यांना सुरुवात झाली. याबाबत अजित पवारांनीच काल सांगितले. गेल्या 2 वर्षात अजित दादांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न कोण उपस्थित करत आहे हे त्यांनीच पाहावे.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी लिहिले होते की, महाराष्ट्राला व मराठ्यांना दुहीचा शाप आहे व ती दुही घरातूनच सुरू होते. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे.

मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा.

राऊत यांनी ही चर्चा सुरू केल्यानंतर अजित पवार यांच्या नाराजीचे वृत्त वेगाने पसरले. ईडीच्या दबावामुळे अजित पवार भाजपकडे जात असल्याचे राऊत यांनी सुचित केले होते. यावर अजित पवार यांनी राऊत यांना चांगलेच सूनावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सुरु असलेल्या चर्चांविषयी बोलायला आमच्या पक्षाचे प्रवक्ते समर्थ आहेत. उगाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आमचे प्रवक्ते म्हणून बोलू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, आमचे वकीलपत्र त्यांनी घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी राऊतांना लगावला होता.