देशात 24 तासांत 10,542 कोरोना रुग्णांची नोंद, 38 जणांचा मृत्यू

देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत बसू लागली आहे. संसर्गाच्या झपाट्यानं लोकांची चिंताही वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 38 टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळं सक्रिय रुग्णांची संख्या 63,562 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत या जीवघेण्या विषाणूमुळं 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या देशात 63,562 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत जे एकूण प्रकरणांपैकी 0.14 टक्के आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.67 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे, आतापर्यंत देशात एकूण 4,42,50,649 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220,66,27,758 डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी (18 एप्रिल 2023) 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एप्रिलमधील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तर त्याचदिवशी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून 949 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर सोमवारी 505 रुग्णांची नोंद झाली आहे.