‘रॅप साँग’ प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठित

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारातील चित्रित केलेल्या किंवा चित्रफितींची वापर केलेल्या रॅप सॉंग प्रकरणाची विद्यापीठीय पातळीवर चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, प्रतिष्ठित प्राध्यापक निवृत कॅप्टन चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव आणि उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे (सदस्य सचिव) आदींचा समावेश आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी समितीला दिले आहेत.

या प्रकरणी शुभम आनंद जाधव (वय 24) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपगीतात तरुणाने तलवार, रिव्हॉल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. याबाबत विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक अधिकारी सुधीर दळवी यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्यापीठाच्या आवारात जाधव याने बेकायदा रॅपगीत चित्रीत केले होते. रॅपगीतात अश्लील शब्द होते. संबंधित रॅपगीत ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर 18 मार्च रोजी ‘रॉकसन सल्तनत’ या मथळ्याखाली प्रसारित करण्यात आली होती. विद्यापीठाच्या आवारात बेकायदा चित्रीकरण तसेच विद्यापीठाच्या आवारात बेकायदा चित्रीकरण तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दळवी यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.