मुंबई: ऊठसुट मोदी सरकार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या तथाकथित पुरोगामी मध्येच जातीवरून जुंपली आहे. केवळ जन्मावरुन ब्राह्मण म्हणून आरोप होणार असेल तर वेदना होतात, अशी खंत वागळे यांनी व्यक्त केली.तर वागळे स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात, असा टोला हरी नरके यांनी लगावला आहे.
निखिल वागळे आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात यांच्यात सोशल मीडियावर वाद सुरू आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धोका असल्याची तक्रारही वागळे यांनी केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये वागळे म्हणतात, ४० वर्ष चळवळीबरोबर घालवल्यावर, प्रत्यक्ष जात, धर्म सोडल्यावर केवळ जन्मावरुन ब्राह्मण म्हणून आरोप होणार असेल तर वेदना होतात. पण आता राग येत नाही. कींव येते हा आरोप करणाऱ्यांची. कारण आरोप करणारे अजून जातीच्या डबक्यातच आहेत.
सामाजिक कार्यकर्ते हरी नरके यांनी वागळे यांना उत्तर दिले आहे. निखिल वागळे उठसूठ दुसऱ्यांची जात काढतात. ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात. एकटा धुतल्या तांदळासारखा नी उरलेले सगळे जग, विशेषत: मागासवर्गीय नेते, कार्यकर्ते भ्रष्ट असल्याचे बेताल बडबडत असतात. वागळे हे निर्दय असून (२०१४ पासून कुंभकर्णी झोपेतल्या) गन्ना पगारे यांचे चाटुकार असलेले विश्र्वंभरी पत्रकार आहेत. वागळे हे कट्टर मंडल विरोधक. चॅनल हेड असताना बहुजन पत्रकारांची गळचेपी करणारे, जातीय कंपुशाही करणारे आणि दाखवायला आजूबाजूला एकदोन मागासवर्गीय ठेवणारे वागळे यांचे खरे रूप त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना विचारा.
स्वत:वर बेतले की ते सहानुभूतीसाठी कांगावा सुरू करतात. जात सोडल्याचा दावा करताना, तसा इतरांचा अनुभव असायला हवा. काय बोलता यापेक्षा कसे वागता हे आम्ही बघणार. त्यात वागळे कायम टोकाला जाणारे, दिखाऊ, सुपारीबाज पत्रकारिता करणारे, असा आरोप नरके यांनी केला आहे.
वागळे साहेब, तुम्ही जर खरंच जात सोडली असेल तर मग जी सोडली आहे तिच्यावरून हिनवल्याच्या वेदना का ब्रे व्हाव्यात? तेव्हा जात सोडली आहे की कवटाळलेली आहे याचे एकदा आत्मपरीक्षण कराच मालक! म्हणजे जात सोडल्याची जाहिरात अहोरात्र करताकरता स्वत:ला तिचीच नशा चढल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुमच्यातला तुच्छतावाद टिपिकल उच्चजातीय आहे. तुम्ही उठताबसता चळवळीतील सगळ्यांचे ऑडिट करता ना? मग तुमचेही होणारच की! पेरावे तसेच उगवते. वागळे यांना त्यागाची अनावर नशा चढलेली आहे. जात सोडल्याची फक्त दवंडी पिटणारे, प्रत्यक्षात विक्षिप्त, माजूर्डे पत्रवीर आहेत निखिल वागळे. त्यांना मित्रांची किंवा चळवळीची कधीच किंमत नव्हती. उलट तेच त्यांचे सॉफ्ट टार्गेट होते. असते. त्यांच्यावर तुटून पडताना त्यांना कायमच चेव येतो. त्यांना 24×365 चळवळीतील दोस्तांवर संशय घेण्याचे भ्रमिष्टपण कधीतरी महागात पडणारच होते! बाजी उलटली की कांगावा सुरू हे नाटक आतातरी बंद करा वागळेसाहेब! जातीचे व्हिक्टिमकार्ड खेळणे हा तर फार केविलवाणा मार्ग झाला. मस्तवालपणा नडणारच, असा टोलाही नरके यांनी लगावला.
