मविआ एकत्र लढण्याबाबत शरद पवार यांच्या मनातच संशय

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा अद्याप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही याबाबत संशय व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले, एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचे वाटप, त्यामध्ये काही इश्यू याबाबत देखील पाहावे लागेल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसे सांगू?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाविषयी मोठ्या चर्चा झडताना दिसून येत आहेत. त्याआधी शरद पवार यांनी जेपीसीवरुन घेतलेल्या भूमिकेवरुनही राजकीय वर्तुळातून विरोधाचा सूर उमटला होता.

काँग्रेसकडून शरद पवार यांनी जेपीसीबाबत घेतलेल्या भूमिकेला विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत संशय व्यक्त करून ठाकरे गट आणि काँग्रेसला संभ्रमात टाकले आहे. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी जेपीसी चौकशीच व्हायला हवी अशी भूमिका मांडली. संजय राऊत यांनीही सत्य समोर येण्यासाठी जेपीसीचेच समर्थन केले होते. मात्र शरद पवार यांची जेपीसी आणि पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरुन घेण्यात आलेली मवाळ भूमिका मविआतल्या घटकपक्षांपेक्षा वेगळी असल्याने सहकाऱ्यांना ते कात्रजचा घाट दाखवणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे.