नागपूर : ज्यांच्यामुळे परिवारातील ५०-६० लोक निघून गेले ते महाविकास आघाडीचंही वाटोळं करतील असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना लगावला आहे. कोराडी येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे आपसात काय सुरू आहे. याबाबत मला बोलायचं नाही. पण शरद पवारांनाही आज ना उद्या कळेलच, की ज्यांच्या परिवारातील ५० लोक निघून जातात ते महाविकास आघाडीचं नेतृत्व पुढे करू शकतात का? हे शरद पवारांना एखाद्या वेळेस कळलेही असेल. शरद पवार काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांच्या महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. परंतु उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागत आहेत, कधी महाविकास आघाडीची सभा वेगळी घेतात. कधी आपली सभा वेगळी लावतात.
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या लोकांना ज्या सवयी लागल्या आहेत, त्या सवयीनुसार ते बोलत आहेत. आमच्या जीवनात, रक्तात कधीही बेईमानी नाही. बेईमानी त्यांच्या रक्तात आहे. आम्ही कधीही कुणाला धोका देत नाही. आम्ही कधीही कुणाला धोका देण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपा कधीही कोणाला धोका देत नाही. ज्याचं ज्याचं जसंजसं नेतृत्व आहे, त्यांना तशी संधी मिळते. त्यांनी धोका दिला आहे, पाठीत खंजीर खुपसण्याचं त्यांचं रक्त आहे, आमचं नाही.
एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि दोघेही उत्तम काम करत आहेत. महाविकास आघाडीकडूनच वावड्या उठवल्या जात आहेत. अजित पवारांना तेच बदनाम करत आहेत. शरद पवारांना हे बोलावं लागत आहे की आमची महाविकास आघाडी टिकेल की नाही टिकेल. हे कशामुळे? कारण, महाविकास आघाडीमध्येच मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे. त्यावर शरद पवारही कंटाळले असतील असं मला वाटतं. कारण, काहीच तारतम्य नाही. सकाळी रोज उठून कोणीतरी बोलतं आणि दिवसभर त्याची उत्तर द्यावे लागतात. खरंतर संजय राऊतांनी ज्या पद्धतीने वाटोळं केलं आहे. पहिले भाजपा-शिवसेना युतीचं वाटोळं केलं, ते आता महाविकास आघाडीचंही वाटोळं करतील. त्यांच्यामुळे ५०-६० लोक निघून गेले. आता महाविकास आघाडीचंही आज ना उद्या वाटोळं होईल, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
