सिंचन, कृषी उत्पादकता वाढीसह जलसमृद्धीसाठी उत्तम पर्याय असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान जनसहभागातून व्यापक प्रमाणात यशस्वी करावे. तसेच येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्वंकष टंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा दोन सुरू करण्यात आला असून त्यातून 5 हजार गावे जलसमृद्ध होणार आहेत. राज्यामध्ये यापूर्वी जलयुक्त शिवार अभियानाची लोकसहभागातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. जलसिंचनाच्या वृद्धीसाठी हे उपयुक्त अभियान असून त्याच्या दुसऱ्या टप्प्यात विविध जलस्रोतांचे बळकटीकरण करावे. यापूर्वी केलेल्या कामांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून नवीन कामे करावीत. त्यासोबतच अभियानांतर्गत गाळमुक्त धरण उपक्रमाची व्यापक अंमलबजावणी करावी. याआधी भारतीय जैन संघटना, बजाज फांऊडेशन, टाटा ट्रस्ट यांच्यासह विविध स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला होता. त्याच धर्तीवर सक्रीय लोकसहभागासह संबंधित विभागांच्या सहकार्याने अभियान यशस्वीपणे राबवावे. जलसंपदा विभागाकडे असलेल्या यंत्रसामुग्रीचा यासाठी उपयोग करुन घ्यावा. त्याचप्रमाणे येत्या काळात पावसाची अनियमितता लक्षात घेऊन चारा छावण्यांचे आतापासूनच नियोजन करून वैरण विकास कार्यक्रम राबवावेत, पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी नियोजन करुन विनाखंड पिण्यासाठीचे तसेच सिंचनाकरिता पाणीसाठा उपलब्ध करण्यावर भर द्यावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून मुबलक स्वस्त वीज उपलब्ध होणार असून उद्योग वाढीस ते पूरक ठरणारे आहेत. हे लक्षात घेऊन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणांनी कल्पकतेने आणि जनप्रबोधनातून भूसंपादनासह इतर बाबींची उपलब्धता करावी. आपला जिल्हा 100 टक्के सौर ऊर्जायुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे सूचित करुन उपमुख्यमंत्री यांनी येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कार्यक्रमात येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था ठेवावी, असेही संबंधितांना त्यांनी यावेळी सूचित केले.
