उद्धव ठाकरेंची जळगावात जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंनी यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेना खरी आहे की खोटी याचं सर्टिफिकेट तुम्ही पाकिस्तानकडे मागता यापेक्षा दुर्दैव काय आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं.
कुणीतरी सांगितलं की खरी शिवसेना काय आहे ? हे पाकिस्तानला विचारलं तरीही ते सांगतील. असं भाष्य केलं गेलं आहे. हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे. कारण तुम्हाला तुमची शिवसेना खरी की खोटी हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं? असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘आता काही लोक तेच-तेच विचार आणि तेच टोमणे सारखे बोलत आहेत. फक्त मैदान बदलत आहेत. सारखे सारखे मर्द बनण्याचे पुरावे द्यावे लागतात, त्यांना काही संशय आहे का? असा सवाल करत टीकास्त्र सोडलं.
इथे जमलेली गर्दी पाहून खरी शिवसेना कुणाची? हे दिसतंय ना? हे कळतं आहे ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कुणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यातल्या सभेत टीका केली होती. ठीक आहे तो त्यांचा दोष आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
