रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात; 17 पोलिस जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीसाठी आज सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या सर्व्हेला आजपासून सुरूवात होणार असून रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत. तर विरोध पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तसाठी जाणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर हा अपघात कशेडी गावाजवळ झाला. तर येथील कशेळी बांध येथे एका वळणावर गाडी थेट खाली पडल्याने हा अपघात झाला.

रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून 45 बारसू रिफायनरी आंदोलकांवर 144 CrPC अंतर्गत अनिवार्य प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हा नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी बारसू परिसरात 2000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहे.

बारसू रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने रिफायनरी विरोधकांभोवती कायद्याचा फार्स आवळला आहे. रिफायनरी विरोधक समितीचे सल्लागार सत्यजित चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कलम 151(3) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही 25 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.