राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; महादेवराव महाडिक, सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरंच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, हे सुद्धा नव्याने सांगण्याची गरज नाही. कंडका पाडायचाच म्हणून सतेज पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे कंडका पडणार? की महादेवराव महाडिकांची शिट्टी पुन्हा एकदा घुमणार याची उत्सुकता आहे.

माजी मंत्री सतेज पाटील विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटात मुख्य लढत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी अंत्यत चुरशीने 12 हजार 336 (91.12 टक्के) इतके मतदान झालं आहे.

राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील २० अशा २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी दोन अपक्षांसह एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुपारपर्यंत निकालाचे कल हातात येण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दोन्ही गटातील सभासद आणि उमेदवारांना वेगवेगळी जागा नेमून देण्यात आली आहे. परिसरात १४४ कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.