वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर; अजिंक्य रहाणेचं दमदार पुनरागमन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. बीसीसीआयने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला संधी देण्यात आलीय. कसोटी संघात अजिंक्य रहाणेचं पुनरागमन झालंय. तर सूर्यकुमार यादवला मात्र संधी मिळाली नाही.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी दिसेल. गिल गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच फॉरमॅटमध्ये फॉर्ममध्ये असून त्याने सर्व प्रकारात शतक झळकावलं आहे. तर रोहित शर्मानेही याआधीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावलं होतं.

या सामन्यासाठी भारतीय संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेला देखील संधी देण्यात आली आहे. त्याला सूर्यकुमार यादवच्या जागी खेळण्याची संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला भारतीय कसोटी संघात ५ व्या क्रमाकांवर खेळण्याची संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आता आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करत अजिंक्य रहाणेने जोरदार कमबॅक केले आहे. तो जानेवारी २०२२ पासून संघाबाहेर आहे.

भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ऑस्टेलिया संघाला २-१ ने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या भारतीय संघातून काही खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.