“आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी रिफायनरी आहे त्यात केंद्र सरकारच्या तीन ऑईल कंपनीज एकत्रित येऊन देशाच्या इतिहासतली सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीमुळे एक लाख लोकांना रोजगार कोकणात मिळणार आहेत. मागच्या काळात नाणारलाही ही रिफायनरी करायचं ठरवलं तेव्हा श्रीमान उद्धव ठाकरेंनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर त्यांच्याही हे लक्षात आलं उशिरा आलं पण आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा असं पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवलं आता पुन्हा तेच विरोध करत आहेत. “ असे फडणवीस म्हणाले.
राजापूर येथील रिफायनरीच्या सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे.
विरोध करणाऱ्यांची संख्या छोटी आहे. तरीही आम्ही त्यांचा सन्मान करतो. ज्यांच्या मनात काही शंका असतील आणि जे खरे विरोधक असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. भूमिपुत्रांवर कुठलाही अन्याय होणार नाही हा आमचा प्रयत्न असेल. पण त्याचवेळी राजकारणापुरतं जे विरोध करत आहेत त्यांचा विरोध सहन करणार नाही. या रिफायनरीमुळे मासे पकडता येणार नाहीत, आंबे पिकवता येणार नाही असंही सांगितलं गेलं. जामनगरला रिलायन्सची रिफायनरी आहे. तिथले आंबे हे निर्यात होतात. आपल्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे आंबे तिथे घेतले जातात. तिथे मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते आहे. कुठेही पर्यावरणावर परिणाम झालेला नाही. तसाच तो आपल्याकडेही होणार नाही. आपण जी रिफायनरी आणतो आहोत ती ग्रीन रिफायनरी आहे. अशाही परिस्थिती खोटं बोलून, दिशाभूल करून किती मोठं नुकसान आपण करतो आहे हे उगाच विरोध करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
जी जमीन आपण निवडली आहे ती कातळ जमीन आहे. त्यातलं जे कातळ हेरिटेज आहे ते आम्ही सोडून दिलं आहे. मुंबईतून येऊन प्रकल्पाला विरोध करत आहेत. हे थांबलं पाहिजे. या महाराष्ट्राचं अतोनात नुकसान हे कधी आरेला विरोध करायचा, कधी पोर्टला विरोध करायचा, कधी समृद्धी महामार्गाला विरोध कर असा विरोध करून तुम्ही केलं आहेत असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते टीव्ही नाईन ह्या माध्यमाशी बोलत होते.
जे लोक विरोध करत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की नेमकी कुणाची सुपारी घेऊन हा विरोध तुम्ही करत आहेत. बरं प्रकल्प बाहेर गेला की बोंब मारायची आणि प्रकल्प येत असेल तेव्हा विरोध करायचा. तिथे माध्यमांनी जाऊन पाहिलं जालियनवाला वगैरे सारखी स्थिती नाही. कुठल्याही गोष्टी न पाहता माईंडलेस पद्धतीने का करता? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
