काँग्रेससोबत जायला तयार पण राहुल गांधी चेहरा नको; भारत राष्ट्र समितीची भूमिका

लोकसभा निवडणुकांना केवळ एक वर्ष राहिल्यामुळे देशपातळीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकीसाठी अनेक बैठका होत आहेत. पण या बैठकांना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती गैरहजर असते. बीआरएसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस “आघाडी”साठी प्रयत्न केले होते. पण आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

केसीआर यांच्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती होते. पण त्यानंतर त्यांनी नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे ठेवले. गेल्या काही काळापासून केसीआर यांनी शेजारच्या राज्यांतही पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसशी त्यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे.

केसीआर यांची मुलगी आणि माजी खासदार के कविता दिल्ली दारू धोरण प्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. पक्षाचे नाव बदलून बीआरएस केले आहे तेव्हापासून ते विविध राज्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पण त्याच वेळी ते तेलंगणामध्ये काँग्रेसलाच टक्कर देत आहेत. केसीआर यांच्या जवळच्या एका नेत्यांनी एक वाहिनीशी बोलताना सांगितलं होत की आमचे एवढेच म्हणणे आहे की, जिथे काँग्रेस मजबूत आहे, तिथे तसा वाटा काँग्रेसला मिळाला पाहिजे. पण जिथे इतर प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे काँग्रेसने जागा सोडल्या पाहिजेत. विरोधी आघाडीसाठी काम करण्याचा आणि विरोधी पक्षांची ताकद वाढवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.”

बीआरएस आणि काँग्रेस पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांनी टीआरएसचे नामकरण बीआरएस केल्यावर टीका केली होती. ते म्हणाले, केसीआर यांची इच्छा असेल तर ते, त्यांच्या पक्षाचे नाव आंतरराष्ट्रीयदेखील ठेवू शकतात. यानंतर केसीआर यांचे सुपुत्र आणि राज्यमंत्री के तारक रामा राव ऊर्फ केटीआर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भावी पंतप्रधानांनी आधी अमेठी जिंकून दाखवावी.