मुंबई : महाविकास आघाडीतील वादंग संपायला तयार नाहीत. शरद पवारांनी 2024 मध्ये तीन पक्षांची आघाडी होईल की नाही याबाबत संशय व्यक्त केल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडी झाली नाही तरी काँग्रेसचा प्लॅन तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी करतील अशा चर्चा अद्यापही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत थेट काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली. सावरकरांच्या मुद्द्यावरूनही ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या काँग्रेसवर नाराज आहे. त्यातच 2024 मध्ये महाविकास आघाडी होईल की नाही? हे आत्ताच कसं काय सांगू? असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी केलं होते. यावर नाना पटोले यांनी म्हटले आहे की महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्याच दिशेने जात आहोत. मात्र महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार आहे.
पटोले म्हणाले, आज निवडणूक होत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? त्याबाबत चर्चा आत्ता करत नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होईल. आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढण्याचा आहे. मात्र जर २०२४ ला महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार आहे.
महाराष्ट्रातल्या लोकांनी चुकून भाजपाला १०५ आमदार निवडून दिले. महाराष्ट्रात कधी नाही ती परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाचे आमदार जास्त प्रमाणात निवडून दिले ही जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारे प्यादी चालवण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही, असेही पटोले म्हणाले.
