मुंबई: देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्र्याच्या हस्ते सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्याचा सन्मान. राजनीति में अकेले जवानी से काम नहीं चलता; जज्बा चाहिए, तजुर्बा भी चाहिए या त्यांनी दिलेल्या मंत्राची हृदय आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणतात, सन 2015 मध्ये पुणे येथे बादल साहेबांना ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार‘ प्रदान करण्याची संधी मला मिळाली होती. त्यावर्षी मी देशाचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होतो तर श्री बादल साहेब हे देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री!
“भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूने असणारे भीष्म पितामह,” या शब्दात मी साहेबांचा उल्लेख केला. तेव्हा त्यांनी स्मितहास्य करून दाद दिली होती. भारतीय राजकारणातील भीष्म पितामह असलेल्या बादल साहेबांना पंजाबच्या जनतेने सन 1957 पासून 10 वेळा विधानसभेत निवडून दिले. 5 वेळा त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री पद सांभाळले. माझ्या सारख्या तरुण मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान स्वीकारल्यानंतरच्या जाहीर मनोगतामध्ये त्यांनी मोठा कानमंत्रच दिला होता. ते म्हणाले होते, “राजनीति में अकेले जवानी से काम नहीं चलता; जज्बा चाहिए, तजुर्बा भी चाहिए!”
‘जज्बा’ आणि ‘तजुर्बा’ राखून असलेला नेता आज स्वर्गवासी झाल्याने भारतीय लोकशाहीचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
