महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. निकाल आल्यानंतर पुढे काय?, यावर चर्चा करता येईल. मात्र, निकाल येण्याआधीच त्यावरून राजकीय चर्चा करण्याइतका वेडेपणा मी तरी करणार नाही, असे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यांचे काही सोर्स असतील. दिल्लीत अशा काही हालचाली सुरू आहेत, असे माझ्या तरी कानावर अजून काही आले नाही. मुंबई व नागपूर येथे अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले की, स्वत: अजित पवार यांनीच याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांनी असा वेडेपणा करू नये, एवढ्या स्पष्ट शब्दात अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना समजावले आहे.
महाविकास आघाडी एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, अशा बातम्या काही माध्यमांवर आल्या होत्या. त्यावर शरद पवार म्हणाले, या बातमीत काहीही अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात माझ्याशी काहीही चर्चा केलेली नाही. कुणीतरी ती टेबल न्यूज केली. त्यावर चर्चा करण्यातही अर्थ नाही.अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा वारंवार केल्या जात आहेत. अजित पवार खरेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत का?, यावर माध्यमांनाच काहीही काम नसल्यामुळे ते अशा चर्चा घडवून आणतात, असा टोला शरद पवारांनी लगावला.
सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची शक्यता असल्यामुळे भाजप राष्ट्रवादीसोबत बी प्लॅन आखत आहे का?, यावर शरद पवार म्हणाले, अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. निकाल आल्यानंतर पुढे काय?, यावर चर्चा करता येईल. मात्र, निकाल येण्याआधीच त्यावरून राजकीय चर्चा करण्याइतका वेडेपणा मी तरी करणार नाही.
