मुख्यमंत्री झाल्यावर सुरक्षा घेणार नाही, सरकारी बंगला वापरणार नाही म्हणणाऱ्या केजरीवाल यांची बंगल्याच्या नूतनीकरणावर ४५ कोटींची उधळपट्टी

मी मुख्यमंत्री झालो, तर सुरक्षा घेणार नाही. सरकारी बंगला वापरणार नाही. लाल दिव्याची सरकारी कार वापरणार नाही. दिल्लीतले व्हीआयपी कल्चर संपवून टाकीन, म्हणणारे अरविंद केजरीवाल यांनी बंगल्याच्या सजावटीसाठी ४५ कोटींचा खर्च केला आहे.दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया हे घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगात असताना आता खुद्द केजरीवाल सरकारी पैशाच्या उधळपट्टीवरून वादात अडकले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८-८ लाख रुपयांचा पडदा लावण्यात आला आहे. त्याचवेळी मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आलाय. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे; यावरून आता भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांचा खरा प्रामाणिकपणा आता उघड झाल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे; करोना साथीच्या काळात बंगल्याच्या सजावटीवर एवढा मोठा निधी का खर्च करण्यात आला, असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येतो आहे. त्यावरूनच भाजपनेही आता अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांनुसार, केजरीवालांच्या बंगल्यावरील एकूण खर्चापैकी ११.३० कोटी रुपये इंटेरिअर डिझायनिंगवर खर्च करण्यात आले आहेत. विशिष्ट प्रकारचे दगड आणि मार्बलवर ६.०२ कोटी खर्च करण्यात आले. हे मार्बल व्हिएतनामचे असल्याचं सांगितलं जातं. अंतर्गत सजावटीसाठी सल्लागारास १ कोटी रुपये देण्यात आले. इलेक्ट्रिकल फिटिंगसाठी २.५८ कोटी, अग्निशमन व्यवस्थेसाठी २.८५ कोटी, वॉर्डरोब आणि अॅक्सेसरीज फिटिंगासाठी १.४१ कोटी आणि किचनमधील साहित्यासाठी १.१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर २०२० ते जून २०२२ या कालावधीत ही रक्कम सहा हप्त्यांमध्ये खर्च केल्याचं कागदपत्रं दाखवतात.