नागपूर : नागपूर हे विदर्भ आणि मध्य भारताचे मेडिकल हब. विदर्भासह शेजारील राज्यातील रुग्ण याठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी येतात. मात्र सामन्यांना परवडेल अशा दरात कॅन्सरवर उपचार उपलब्ध नव्हते. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांना ही कमतरता जाणवत होती. त्यामुळे त्यांनी आठ वर्षांपूर्वी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे स्वप्न पाहिले. देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की काँग्रेसच्या काळात पूर्वी भूमिपूजन व्हायचे पण उद्घाटनाचा पत्ता नसायचा. भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपल्याच कारकीर्दीत करण्याचा योग फडणवीस यांनी साधला आहे.
मुख्यमंत्री असताना 28 फेब्रुवारी 2015 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे भूमिपूजन झाले होते. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
नागपुरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेलं 470 बेडचं हे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे. धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे. कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडे पाहिलं जात आहे.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सुमारे 25 एकरावर 470 बेडचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट युनिट आहे. 10 अद्ययावत ऑपरेशन थिएटर आहेत. कर्करोगाच्या उपचारासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सोय याठिकाणी उपलब्ध आहे. ओन्कॉलॉजी आयसीयू असलेलं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय आहे. लहान मुलांवर सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार देणार मध्य भारतातील एकमेव रुग्णालय आहे. दहा मजली इमारतीत साडेनऊ लाख चौरस फुटाचे बांधकाम आहे. रुग्णालयाची क्षमता 700 बेडपर्यंत वाढविता येण्याइतक्या पायाभूत सुविधा आहेत.
2017 मध्ये एनसीआयची सुरुवात 30 बेडच्या छोट्याशा रुग्णालयाच्या स्वरुपात धरमपेठ परिसरात झाली होती. आता या रुग्णालयाला विराट स्वरुप प्राप्त झाले आहे. यावेळी 470 बेडचे कॅन्सरचे अत्याधुनिक रुग्णालय तयार झालं आहे.
देशभरातील कर्करुग्णांना अत्यंत किफायतशीर दरात सेवाभावाने उपचार देणे नॅशनल कॅन्सर इस्टिट्यूटच्या (‘एनसीआय’) माध्यमातून नक्कीच शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरिबांसाठी कर्करोगावरील उपचार किफायतशीर दरात देण्यावर भर देणे गरजेचे असून यासाठी देशातील विविध दानशूर समाजसेवी संस्थांनी पुढे यावे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी हा ऐतिहासिक दिवस आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळणे गरजेचे असून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नागपूर आणि मध्य भारतातील रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध होत आहे. ‘एनसीआय’ मध्ये कर्करुग्णांना सेवाभावातूनच उपचार देण्यावर भर देण्यात येईल. कर्करोगावरील उपचारांसाठी सर्वोत्तम असे तंत्रज्ञान ‘एनसीआय’मध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी देशभरातून रुग्ण मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात जातात. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय होणेही गरजेचे असते. कर्करोगावरील उपचार अनेक वर्ष करावे लागतात. यादरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सुविधाही मिळणे गरजेचे असते. अशा निवासाची सुविधाही “एनसीआय’ येथे करण्यात येत आहे. ‘एनसीआय’च्या माध्यमातून डॉ.आबाजी थत्ते यांच्या स्मृतीचे जतन होत आहे.
