चेन्नईविरुद्ध विजयाचा चौकार लावण्यासाठी उतरणार राजस्थान रॉयल्स

इंडियन प्रीमियर लीग मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लीग सामना खेळवला जाईल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. राजस्थान आज चेन्नईविरुद्ध हा सामना खेळेल, तेव्हा त्यांच्या नजरा 4 वेळाच्या चॅम्पियनविरुद्धच्या विजयाकडे असतील. आयपीएलच्या मागील तीन सामन्यांमध्ये राजस्थानने चेन्नईचा पराभव केला आहे.

चालू हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी, सीझनच्या 17 व्या सामन्यात दोघेही आमनेसामने आले होते, जेव्हा चेपॉकच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यात राजस्थानने तीन धावांनी विजय मिळवला होता.

गुणतालिकेत 10 गुण आणि +0.662 रनरेटसह चेन्नई सुपर किंग्सचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर गुजरातचा संघ 10 गुणांसह +0.580 रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स 8 गुण आणि +0.844 रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. असं पाहिलं तर लखनऊ, बंगळुरु आणि पंजाबचे आठ गुण आहेत. पण राजस्थानचा रनरेट चांगला असल्याने तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सध्या टॉप फोरमध्ये असलेला एखादा संघ पराभूत झाला तर दुसऱ्या संघांना संधी मिळते. तशी काही स्थिती आहे.

डेव्होन कॉनवे (३१४ धावा), ॠतुराज गायकवाड (२७० धावा), अजिंक्य रहाणे (२०९ धावा) व शिवम दुबे (१८४ धावा) या चार फलंदाजांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.चेन्नईच्या गोलंदाजी विभागात अनुभवाची कमतरता आहे. रवींद्र जडेजा व मोईन अली वगळता इतर गोलंदाजांकडे अनुभव नाही. गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो यांच्या मार्गदर्शनात तुषार देशपांडे व आकाश सिंग यांचा खेळ बहरत आहे.राजस्थानच्या संघाने पहिल्या पाचपैकी चार लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण त्यानंतर सलग दोन लढतींमध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग – 11

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि जेसन होल्डर.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे आणि महेश टेकशाना.