भाजपा नेते नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे. संजय राऊतांनी भाजपा नेत्यांविरोधात वक्तव्य करणं थांबवावं अन्यथा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडू, असं नितेश राणे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना इशारा दिला आहे. तसंच, ही पत्रकार परिषद संजय राऊतांनी सेव्ह करून ठेवावी, जेणेकरून मी वॉर्न केलं नव्हतं असं होणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले.
आम्ही ओरिजिनल शिवसैनिक म्हणून मोठे झाले आहोत. आम्ही राऊतांसारखे चायनिज मॉडेल नाही. त्यामुळे राऊतांनी इथून पुढे विचार करुन आमच्या नेत्यांवर बोलावे. राऊतांसारखी माणसे बाजारात स्वस्तात विकत मिळतात. त्यांनी आमच्या नेत्यांवर काही बोलल्यास मी अर्ध्या तासात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कपडे टराटरा फाडील, असे म्हणत राणेंनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिंदे व फडणवीस यांच्यावर बोलण्याची राऊतांची लायकी नाही. राऊत तुम्ही अजून राणेंना ओळखलेले नाही. त्यामुळे यापुढे विचार करुन बोलायचे. जर फडणवीसांबद्दल काही बोललास तर मी ठाकरेंचे कपडे फाडील, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.
राऊत हे सत्यपाल मलिक यांना भेटणार आहेत. मलिकांविषयी पाकिस्तान गोडवे गात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचे काम मलिक करत आहे आणि अशा व्यक्तीला राऊत भेटणार आहेत. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी मी करत आहे, असे राणे म्हणाले आहेत.
“नारायण राणे ३९ वर्षे बाळासाहेबांसोबत राहिले. आम्हाला सगळ्या गोष्टी माहितेय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सर्व गोष्टी माहिती आहे. यापुढे बोलताना विचार करून बोलावं. उद्ध ठाकरेंचा फोटो बघून बोलावं. भ्रष्टाचाराचे आरोप करायची खुमखुमी आहे. तुम्हाला वाटत असेल ईडी, सीबीआय भाजपामध्ये आल्यावर चौकश्या बंद करते. तुमच्याकडे पुरावे असतील तर मीडियासमोर पळण्याची गरज नाही. कोर्ट आहे. कोर्टात जा, कोणी थांबवलंय? आम्ही हात बांधलेले नाहीत,” असं नितेश राणे म्हणाले.
“भ्रष्टाचाराचा आरोप ठाकरेंवरही झाला आहे. खुनाचा आरोप आदित्यवरही झाला. नंदकिशोर चर्तुर्वेदी, पाटणकरांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दिशा सालियनसह खुनाचे संबंध बाहेर येतील. यासंबंधित ऐकण्याची तयारी ठेवावी”, असंही नितेश राणे म्हणाले.
