महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा असेल. यानंतर वज्रमूठ सभा होणार नाही, असा दावा भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे ओझे झाले आहे. आणि हे ओझे किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. या टीकेला भाजपने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
राऊतांनी माझ्या एकाच पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. संजय राऊत हे ना शरद पवारांचे आहेत ना उद्धव ठाकरेंचे. ते आता लावारिस आहेत का? असा प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहित नाही, तो आम्हाला काय शिवसेना शिकवतो, असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले आहे.
संजय राऊत हे स्वतःला शिवसैनिक समजतात. शिवसेनेबद्दल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल मोठमोठ्या बाता करतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. शिवसेना स्थापन झाली ती तारीख आणि वर्ष माहित नाही त्यांना बाळासाहेबांबद्दल आणि शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का ? असा माझा प्रश्न आहे. मी राजकीय आरोप करत नाही. माझ्याकडे व्हिडीओच्या रुपात पुरावा आहे. महाराष्ट्राला हे समजलं पाहिजे की संजय राऊत यांना शिवसेनेच्या स्थापनेचं वर्ष माहित नाही, त्याने आम्हाला शिकवू नये. संजय राऊत ओरिजनल शिवसैनिक नाही. चायनीज मॉडेल आहे अशी टीका पुन्हा एकदा नितेश राणे यांनी केली.
