अजित पवारांची नाराजीची चर्चा केवळ चर्चा आहे का? खरे नाराज जयंत पाटील आहेत का? अजित पवारांच्या आधी जयंत पाटील आपला वेगळा गट घेऊन कुठे जाण्याच्या मानसिकतेत आहेत का? अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात भाकरी फिरवण्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच हे विधान केले आहे. भाकरी फिरवणे ही अकबर-बिरबल यांच्या कथेतील गोष्ट आहे. भाकरी का करपली, पान का सडले आणि घोडा का आडून बसला याच एकच उत्तर होते ते म्हणजे हा सगळा प्रकार भाकरी न फिरवल्याने घडला. म्हणजेच फिरवले नाही तर पान सडते, फिरवले नाही तर भाकरी करपते, फिरवले नाही तर घोडा अडून बसतो, असंच विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात करून टाकलय. शिवाय समांतर वेळी अचूक टायमिंग साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील एक वक्तव्य केले आहे.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अजित पवार यांच्या ऐवजी जयंत पाटलांचे नाव घेतले. अमोल कोल्हे यांना जयंत पाटीलच महाराष्ट्राचे ‘आदर्श मुख्यमंत्री’ होऊ शकतात असे वाटते. अमोल कोल्हे म्हणाले, नेत्यांची मुलं अनेकदा ऍरोगंड असतात. ह्या विधानातून अमोल कोल्हे यांना असे सुचवायचे असेल की राष्ट्रवादीचा खरा वारसा जयंत पाटीलच चालू शकतात. एकीकडे शरद पवारांचे संकेत तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांचे वक्तव्य यात काही वेगळे अर्थ तर दडले नाहीत ना…शिवाय यातून अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात. अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांची युती आहे का? हे दोघे मिळून राष्ट्रवादीला काही धक्का देण्याच्या तयारीत आहे का?
राष्ट्रवादीला खरा फटका अजित पवारांपासून बसणार आहे की जयंत पाटलांपासून बसणार आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. अजित पवारांवर पक्ष सोडण्यावर वादंग उठल्यावर,चर्चा उपस्थित झाल्यावर त्यांनी स्पष्टच सांगितले आहे की ते मरेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार. येथे एक प्रश्न आणखी उपस्थित होतो तो म्हणजे अजित पवार अचानक निघून गेले, अजित पवार नॉट रिचेबल अशा आशयाच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत बातम्या माध्यमांपर्यंत कोण पोहचवते? या सगळ्या प्रकरणात शरद पवारांना अंधारात ठेवले जाते का? अजित पवारांची मुख्यमंत्री पदावरून चर्चा घडवून जयंत पाटील अगदी सहजपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचा कार्यक्रम आखण्यात व्यस्त आहेत का? आपण वरती मांडलेली मांडणी ही सर्व प्रश्न आणि तर्क या आधारावरील आहे.
जयंत पाटलांचे सत्ताधारी पक्षासोबत असलेले सख्य देखील बघायला पाहिजे. जयंत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडायचे असेल तर ते स्वतःला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उपस्थित करतील. मात्र, जो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि सुप्रिया सुळे आहे. तो पर्यंत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून मुख्यमंत्री होणे कठीणच आहे. एक वेळ अजित पवारांना द्यायचे पद शरद पवार हे जयंत पाटलांना देऊ शकतील. पण शरद पवारांच्या मनामध्ये जर सुप्रिया सुळेंना पद देण्याची इच्छा असेल तर तिथं ते तडजोड करून जयंत पाटलांना मुख्यमंत्री पद देण्याची शक्यता नाहीये.
शरद पवार महाविकास आघाडी मध्ये राहण्याच्या मुद्दावर ठाम आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून कोण-कोण मुख्यमंत्री होऊ शकते. याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. याचा असाही एक अर्थ लावला जाऊ शकतो तो म्हणजे अजित पवारांची चर्चा झाली. मात्र यातली खरी चर्चा ही जयंत पाटलांची!
