साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका आहे. त्यामुळे मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. आता सीआयएसएफची सुरक्षा मंदिराला देण्यास प्रस्तावित आहे. त्याला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करत १ मेपासून शिर्डीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डी बंद राहू नये म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी शिर्डीत बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ मे पासून शिर्डी बंद राहणार नसल्याची माहिती पालकमंत्री विखे यांनीच दिली आहे.
शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येऊन युवकांना साथ देत विविध मागण्यांसाठी तसेच साई संस्थानच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई उभारण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयाकडे सरकारचे लक्ष खेचण्यासाठी महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे पासून शिर्डी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच दिवशी संध्याकाळी ग्रामसभेचे आयोजन करून चार विषयांचा ठराव घेण्याचे निश्चित केले हाेते.
दरम्यान आज (शुक्रवार) पालकमंत्री विखे पाटलांची ग्रामस्थांनी भेट घेतली. या भेटीत विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या विविध मागण्या जाणून घेतल्या. तसेच ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आहे. सध्या या पदावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी नियुक्त आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद आयएएस अधिकाऱ्यांकडे नको हे पद रद्द करून उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्याकडे असावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
