कर्नाटकातील कलबुर्गी येथील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे नेते तर खर्गे यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत. आता कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हा टर्निंग पॉइंट असेल. दक्षिणेकडील राज्यांतील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय तर कोणाच्याही विरोधात वैयक्तिक टीकाटिप्पणी स्वीकार करत नाहीत. जरा थांबा आणि 10 मे रोजी काँग्रेसच्या ताबूतवर शेवटचा खिळा कसा ठोकला जातो ते पहा, असे ट्विट सूर्या यांनी केले आहे.
खर्गे यांनी काल प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांना उद्देशून ते विषारी साप असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर देशभरात गदारोळ उठला. आपले वक्तव्य अंगलट येत असल्याचे लक्षात येताच आणि निवडणुकीत याचा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्यानंतर खर्गे यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली.
