राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येत आहेत. काही ठिकाणचे निकाल हे दिग्गज राजकीय नेत्यांसाठी मोठा धक्का ठरताना दिसतायेत.
असाच धक्का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बसला असून त्यांना होमग्राउंडवर दारुण पराभव झाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा क्षेत्रात येते.18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीतला काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळाला. तर, भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 14 जागांवर विजय मिळविला. भंडारा इथं काँग्रेसचा 9 जागांवर विजय झाला. तर, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीनं 9 जागांवर विजय प्राप्त केला आहे.
राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र आहेत. मात्र स्थानिक निवडणुका लढवताना ही आघाडी पाळली जातीचं असे नाही. नाना पाटोले यांचे होमग्राउंड लाखनी येथे देखील हेच पाहायला मिळाले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप व शिवसेना (शिंदे) यांच्याशी हातमिळवणी करत पटोलेंना पराभवाचा धक्का दिला.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादी – भाजप – शिवसेना (शिंदे) यांची युती होती. येथे तिन्ही पक्षांनी मिळून ९ जागा जिंकल्या तर काँग्रेसने उर्वरित ९ जागा आपल्या खिशात घालून निवडणूक बरोबरीत सोडवली. निवडणूक बरोबरीत सुटल्याने भंडाऱ्यात पुढे काय राजकीय खेळी खेळली जाते हे पाहावे लागणार आहे.
