कर्नाटकात मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शनिवारी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत.
यावेळी त्यांनी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘काँग्रेसच्या लोकांनी मला आतापर्यंत मला 91 वेळा वेगवेगळ्या शिव्या दिल्या आहेत. शिव्यांच्या डिक्शनरीवर वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी एवढी मेहनत त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी घेतली असती तर त्यांची आज ही अवस्था नसती’, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.
जो सामान्य जनतेचा विचार करतो, त्याचा काँग्रेस द्वेष करते. मोठ्या महापुरूषांनाही काँग्रेसने शिव्या दिल्या आहेत. काँग्रेस शिव्या देते, पण, मी जनतेचं काम करत राहणार आहे. जनतेचं समर्थन मला असल्याने शिव्या मातीत मिसळून जातील. कर्नाटकची आणखी सेवा करायची आहे. त्यासाठी पूर्ण बहुमताचं सरकार पाहिजे,” असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
कर्नाटकात गेल्या पाच वर्षात सामान्य माणसानं किती विकास केला, हे आपण पाहिलं आहे. तुमची ही स्वप्नं पूर्ण करण्याचं काम भाजपनं हाती घेतलं आहे. कर्नाटकला देशातील नंबर 1 राज्य बनवायचं असेल, तर इथं डबल इंजिनचं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आम्ही पीएम किसान सन्मान निधीची सुरुवात केली, तेव्हा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार होतं. त्यांनी लाभार्थी शेतकर्यांची यादी केंद्र सरकारला पाठवली नाही. इतका शेतकऱ्यांचा द्वेष कशासाठी? छत्तीसगड आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असाही मोदींनी हल्लाबोल केला.
