ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीपर्यंत महाराष्ट्राला न्यायचं आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

आज ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. आजचा हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील 80 पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो. १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिवाय या दिवशी कामगार दिनही साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

“महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी राजकीय नेत्यांनी संबोधलं होतं की आज देशामध्ये १४ वं रत्न जन्माला आलं. त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रचंड प्रगती ही संपूर्ण देशामध्ये सर्वांचे डोळे दीपून जातील अशाप्रकारचे राहिली आहे. देशाच्या जीडीपीत १५ टक्के योगदान महाराष्ट्राचं आहे. देशाच्या एकूण इंडस्ट्रीस आऊटपूटमध्ये २० टक्के आऊटपूट महाराष्ट्र देतंय. देशाच्या एकूण निर्यातीच्या १५ टक्के निर्यात महाराष्ट्रातून होतेय. देशामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय. वेगवेगळ्या मानकांवर महाराष्ट्राने अतिशय चांगली प्रगती केली आहे. माता मृत्यू दर, अन्य सामाजिक मानकं यामध्ये महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली आहे. अत्यंत पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने बघितलं गेलं”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि राज्याने विविध क्षेत्रात प्रगती केली. निसर्गाच्या लहरीपणा मुळं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. शेतकरी समृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.केंद्र सरकारनं किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी विविध योजना सुरु केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र प्रगतीशील राहिला आहे, त्याला आणखी प्रगतीशील करायचं. ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीपर्यंत महाराष्ट्राला न्यायचं आहे. शेवटच्या माणसांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन प्रगतीशील महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकार कार्यरत राहील, असा संकल्पही त्यांनी यावेळी मांडला.