ग्राहकांना सलग दुसऱ्या महिन्यात दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. देशातील चार महानगरात गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे जेवढे दर होते. तेवढेच या महिन्यात राहणार आहेत. म्हणजे या महिन्यातही घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थे राहणार आहेत. मार्च महिन्यात मात्र, घरगुती गॅस सिलिंडरचे दर बदलले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात हे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे.
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. कंपन्यांनी या महिन्यातही व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171 रुपयांनी कमी केल्या आहेत. पाटणा, रांची ते चेन्नईपर्यंत व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 171.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी सरकारनं 19 किलोंच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती.
दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅसच्या किमतीत बदल करतात. १ एप्रिल २०२३ रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. त्यानंतर गॅस सिलेंडर सुमारे 92 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांहून अधिक वाढ झाली होती.
