केरळ स्टोरीवर सरकारकडून बंदीची मागणी वितरक मात्र पाठीशी

‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, केरळमधील राजकारण्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. तर, चित्रपट वितरकांनी मात्र चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली तरी तो प्रेक्षक ओटीटीवर जाऊन बघतील, त्यामुळे या बंदीला अर्थच राहणार नाही, असे म्हटले आहे.

सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ), द अपोझिशन युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) आणि त्यांच्या युवा संघटनांनी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचाही याला विरोध आहे.

‘फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनायझेशन ऑफ केरळ’च्या (एफईयूओके) सदस्यांनीही ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यास त्याला काहीच अर्थ उरणार नाही. जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, तेव्हा प्रेक्षक तो तसाही पाहतीलच,’ असे म्हटले आहे. या संघटनेचे सदस्य असणारे आणि कोचीमधील एका चित्रपटगृहाचे मालक असलेले सुरेश शेणॉय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बंदी हा चुकीचा पायंडा आहे. ही एकप्रकारची सेन्सॉरशिप असल्याची टीका केली आहे.