राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील या घडामोडींवर आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या स्टेजला मी त्यावर बोलणं योग्य वाटत नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तांत्रिक मुद्दा आहे. पक्ष कोणत्या दिशेला जातोय ते माहिती नाही. आता यावेळी बोलणं योग्य वाटत नाही. आम्ही घडामोडींकडे लक्ष देऊन आहोत. योग्यवेळी प्रतिक्रिया देऊ”
“हे काय होतंय, का होतंय, या सर्व गोष्टी समोर येतील तेव्हा आम्ही यावर बोलणं योग्य ठरेल. शरद पवार यांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. पण मलाही पुस्तक लिहायचं आहे. मी त्यामध्ये योग्य गोष्टी लिहिणार आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय ते मी पुस्तकात लिहीण”, अशी सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
दरम्यान, 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्या अगोदर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार होते. या प्रसंगावर शरद पवार यांनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये भाष्य केले आहे.
