”शरद पवारांनी कोणत्या कारणाने पदाचा राजीनामा दिला हे सांगणे शक्य नाही. अजित पवारांबाबत माध्यमांत जे काही येत होते ते की, त्यांच्या परिवारात काय असेल किंवा शरद पवारांची प्रकृतीचा विषय असो, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतरच सांगणे योग्य ठरेल, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. माध्यमांनी आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
नाना पटोले म्हणाले, आम्हाला वाटायचं, शरद पवार शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असतील. एका विचारधारेशी लढत राहतील. परंतु त्यांनी कुठल्या कारणामुळे राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे.पण त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीत जेही अध्यक्ष होतील त्यांच्यासोबतही आमचे चांगले संबंध राहतील.
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणांनंतर सभागृहामध्ये शरद पवारांच्या नावाच्या घोषणांचा अक्षरक्षः पाऊस पडला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावरदेखील झाले होते. धनंजय मुंडे हे देखील शरद पवारांच्या पाया पडले आहेत. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवरले आहे. याशिवाय जयंत पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आदींसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते यावेळी पवारांच्या बाजूला स्टेजवर उपस्थित होते.
