देवेंद्र फडणवीस यांचे मॉरिशसवाशियांसमोर केलेले भागवत धर्माचे रसाळ निरूपण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. याच दौऱ्यात त्यांनी मॉरिशसवाशियांसमोर भागवत धर्माचे रसाळ निरूपण केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात मोगलांची आक्रमणे होत होती, अतिशय विषण्ण प्रकारची परिस्थिती होती. त्यावेळी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन आमचा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या दर्शनाला जात होता. किती अत्याचार झाले, अनाचार, दुराचार सहन करावा लागला. कितीही रोगराई पसरली तरी प्रत्येक आषाढीला कार्तिकीला आपला भागवत ध्वज खांद्यावर टाकून ही सगळी मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला जात होती.

पसायदानातील विश्वात्मकता मांडताना फडणवीस म्हणाले, बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिले. हे पसायदान विश्वाला मानणारे आहे. ते केवळ मराठी माणसा करता नाही, केवळ हिंदू माणसा करता नाही, भारता करता नाही. संपूर्ण विश्वाकरता मागणे मानणारी ही वारकरी संस्कृती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया रचला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. अत्यंत कठीण काळात लोक पंढरीकडे जायचे. त्या सगळ्या आक्रमणात आमचा भागवत धर्म, महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला तो केवळ आमच्या वारकरी संप्रदायामुळे, पांडुरंग भक्ति मुळे आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे. आजही ती परंपरा अविरत चाललेली आहे. त्या परंपरेत कुठेही खंड नाही. वारीला अनेक किलोमीटर पायी जातानाचा आनंद अत्यंत वेगळा असतो. अतिशय साधेपणाने हरिपाठ करत नाचत, वाजत, गाजत अत्यंत आत्मिक आनंद लुटत लोक पंढरीकडे जात असतात.