अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही, परंतु वृत्तानुसार, दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 13 मे रोजी नवी दिल्लीत साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. खरं तर दोघे गेल्या महिन्यात 10 एप्रिल रोजी साखरपुडा करणार असल्याची बातमी याआधी आली होती. पण आता ताज्या वृत्तानुसार, या महिन्यात दोघे अधिकृतरित्या आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत.
लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती परिणीती व राघव चड्ढा यांच्याकडून मिळालेली नाही. पण, परिणीती व राघव चड्ढा सहा महिन्यांत म्हणजेच २०२३च्या ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काही दिवसांपूर्वी परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत होती. तिच्या हातातील अंगठी पाहून परिणीती आणि राघव यांनी गुपचूप साखरपुडा केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परिणीती चोप्राची बहीण व प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवरच ती भारतात आल्याचे बोलले जात होते.
परिणीती आणि राघव अद्याप त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगून आहेत. पण त्यांच्याशी संबंधित अनेकांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच गायक आणि अभिनेता हार्डी संधू याने दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तो म्हणाला की, “मी परिणीतीसाठी खूप आनंदी आहे, मी तिला शुभेच्छा देतो. मी तिचे फोनवर अभिनंदनही केले आहे.”
