मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता; मराठी बहुल भागात प्रचार करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला जाण्याची शक्यता आहे.. मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करतील, अशी माहिती समोर येत आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तिथं सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि जेडीएसचं प्रमुख आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठीस जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल यांच्यामध्ये लढत होत आहे. त्या राज्यात सत्ताधारी पक्षाला संधी न देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे यावेळी भाजपला धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मे महिन्याच्या १० तारखेला मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये २२४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असते. त्यामुळे यावेळी कुठला पक्ष स्पष्ट बहुमत मिळवतो की, गेल्या वेळी प्रमाणे पुन्हा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.