राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी काल आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी मनधरणी सुरू आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होते आहे. पण, याच वेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये, अशा शब्दात पटोलेंनी राऊतांना सुनावलं.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करेल असे वाटत नाही. शरद पवार शाहू फुले आंबेडकर विचारांचे असून ते भाजप सोबत जाणार नाही असे आमचा विश्वास आहे अशा बातम्या भाजपकडून पेरल्या जाऊ शकतात. संजय राऊत यांनी चोंबडेगिरी थांबवावी. ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या तिथे प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये, असे नाना पटोले म्हणाले.
आमच्या पक्षात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. आम्ही यांच्याकडे आलो नव्हतो तर ते आमच्याकडे आले होते. सोनिया गांधी यांच्याकडे आले होते. त्यामुळं कोणाच्या मध्यस्थीने झाले, आम्ही सत्तेसाठी नव्हतो.’ असं देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. तसचं, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार यावर नाना पटोले यांनी सांगितले की, ‘राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होईल यावर आम्ही बघत नाही. दुसऱ्याच्या घरात आम्ही डोकावत नाही.
शरद पवार यांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दल जे आरोप करण्यात आले आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ असे नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे आल्या नव्हत्या. शरद पवार सोनिया गांधींकडे गेले होते. आज त्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ते मोठे नेते आहे ते काहीही बोलू शकतात लिहू शकतात योग्यवेळी त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ, असे नाना पटोले म्हणाले.
