जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मी पक्षावर नाराज नाही व पक्षदेखील माझ्यावर नाराज नाही, असे ते म्हणाले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी नव्या नेतृत्वावर बोलायला नकार दिला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “आज ही बैठक होणार आहे, हे मला माहीत नव्हतं. मला याची कुणीही कल्पना दिली नव्हती. आज माझी साखर आयुक्तांबरोबर नियोजित बैठक होती, त्यासाठी मी सकाळी मुंबईतून पुण्याला आलो. ही बैठक पार पडल्यानंतर मी परत मुंबईला जाणार आहे.”
जयंत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं, हे कार्यकर्त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आज सकाळपासून मी मुंबईत नाही. मला अनेक आमदार, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्षांनी फोन करून सांगितलं की, पवारसाहेबांनी राजीनामा देणं योग्य नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.”
