जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या अजय बंगांची नियुक्ती

भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असणार आहेत. बुधवारी अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची जागतिक बँकेने दिली आहे. मास्टरकार्ड इंक.चे माजी सीईओ बंगा याच्या नावाला गेल्या महिन्यात अध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून मान्यता मिळाली होती. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता बंगा हे 2 जून रोजी पदभार स्वीकारतील. दरम्यान जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारताने देखील पाठिंबा दिला होता.

अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत होते. अंजय बंगा यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. पुढे त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीएदेखील केलं. अजय बंगा यांनी नेस्ले, सिटी ग्रुप, मास्टरकार्डसारख्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

२०२१ मध्ये मास्टरकार्ड या कंपनीतून निवृत्ती घेतली त्यानंतर खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिक जॉईन केली. बंगा हे जनरल अटलांटिक कंपनीत ३.५ अरब डॉलरच्या क्लायमेट फंडच्या अ‍ॅडव्हायजरी बोर्डाचे सदस्यही आहेत.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन झाल्यापासून बंगा यांनी विविध सरकारांच्या 96 अधिकाऱ्यांची भेट घेतली. सरकारी अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक आणि सिव्हील सोसायटी यांना भेटण्यासाठी त्यांनी तीन आठवड्यांच्या कालावधीत आठ देशांमध्ये प्रवास केला.