मराठी भाषिकांच्या मागे मीही आहे आणि भाजपाही आहे; संजय राऊतांकडून काँग्रेसची दलाली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा चालू असताना दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. बेळगावसह सीमाभागावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणुकांवरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यासंदर्भात आज बेळगावमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली.

संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी इथे येत आहेत, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांच्या मित्र पक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होते की, तुम्ही इथे उमेदवार उभे करु नका. तुम्ही त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका, ते असे बोलत नाहीत. कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्याकरिता काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत इथे आले आहेत, असा घणाघात फडणवीसांनी राऊतांवर केला आहे.

तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमूख यांची देखील आठवण सांगितली. विलासराव देशमूख मुख्यमंत्री असताना ते कर्नाटक येथील काँग्रेसचे इंचार्ज होते. तेव्हा ते निवडणूक प्रचारात संपूर्ण कर्नाटकात फिरत होते, असे ते म्हणाले आहेत. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी इथे आलोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. “मराठी भाषिकांच्या मागे मीही आहे आणि भाजपाही आहे”, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.