राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तालयाने साडे चार लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकऱणी भाजप आमदार राम शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाच आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यात 12 तारखेपासून गळीत हंगाम सुरू केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शिंदेंनी दिले होते. यावेळी त्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती. मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते.
