मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तांतराच्या चर्चा सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण यावर अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं विधान अजित पवारांनी केलं.

हे सगळं सुरु असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यामध्ये जवळपास तासभर बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही खरतंर पहिलीच भेट आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झालं त्यावेळी भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल होते. पण नंतर त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली. या दरम्यान राष्ट्रपतींकडून रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. पण नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या काही दिवसांपासून भेट झाली नव्हती. त्यामुळे राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा संबंध सर्वोच्च न्यायालयाच्या संत्तासंघर्षावरील संभाव्य निर्णयाशीही जोडला जात आहे. एकनाथ शिंदे हे स्नेहभोजनासाठी राजभवनावर गेल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. मात्र, यामागे काही राजकीय कारणं असू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.