भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज के एल राहुल जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. के एला राहुलला आयपीएलमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे राहुल आता यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यालाही मुकणार आहे, अशी माहिती मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात झालेल्या सामन्यात राहुलला गंभीर दुखापत झाली.
पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. केएल राहुल टीम इंडियाचा भाग आहे. जर, त्याची दुखापत गंभीर असेल, तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. शिवाय टीम इंडियाला त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याबाबत विचार करावा लागेल. क्रिकबझच्या माहितीनुसार, केएल राहुलने आयपीएल कॅम्प सोडला असून तो आता एनसीएच्या नजरेखाली आहे. त्याच्या विविध चाचण्या आणि स्कॅनसाठी तो मुंबईला पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी केएल राहुल फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे.
त्याच्या दुखऱ्या पायाचे स्कॅन झाल्यानंतरच तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळू शकतो की नाही हे स्पष्ट होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ही 7 ते 11 जून दरम्यान लंडन येथील ओव्हलमध्ये होणार आहे. राहुलला हॅमस्ट्रिंग किंवा हिप इंजरी झाल्याचं बोललं जात आहे. १० महिन्यांपूर्वीच राहुलने हार्नियाची शस्त्रक्रिया केली होती.
राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने 34.25 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतासाठी सलामी करताना त्याने दोन शतकी खेळी केल्या आहेत. आयपीएलचे लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलसाठी लंडनला रवाना होणार आहे.
