राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी सांगून दिला राष्ट्रवादीचा नवा फुल फॉर्म महाराष्ट्राला किळस आल्याचे शरसंधानअमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सध्या राजीनामा, नाराजी नामा नाट्य सुरू असतानाच राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करत शरसंधान साधले आहे.
बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात एनसीपीचा नवा फुल फॉर्म जाहीर करत नवे नामकरण केल्याचे ट्विटरवर पाहायला मिळत आहे. त्यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार असल्याचेही संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपमध्ये जातील या चर्चा सुरू असताना राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजित पवार यांना कात्रजच्या घाटात गाठल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू होती.
शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असतानाच आज, शुक्रवारी पाच मे रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या राजीनाम्याचा विषय एकमताने फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर शरद पवार कायम आहेत. एकंदरीतच ना इधर का ना उधर का अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची झालेली असतानाच महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किळस आलेली आहे, असे ट्विट करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवे नामकरण केले आहे. एनसीपी एन म्हणजे नौटंकीबाज, सी म्हणजे चाटुकार पी म्हणजे पार्टी असे म्हटल्याने महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येत आहे.
