उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा, विकासविरोधी चेहऱ्याला बारसुचा खांदा, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या बारसु येथे भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे. स्वत:च पत्र लिहायचे आणि रिफायनरी बारसूला करा, असे सांगायचे. मग स्वत:च चिथावणीखोर कृती करायची. यातून उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा पुढे आला आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


कर्नाटकातील धारवाड येथे पत्रकारांशी ते बोलत होते. नाणार रिफायनरीला विरोध झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्वतः केंद्र सरकारला भारसो येथील जागा रिफायनरीसाठी सुचविली होती. मात्र आता ठाकरे घटानेच त्याला विरोध सुरू केला आहे. शनिवारी ते स्वतः बारसू येथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे.

स्वत:च पत्र लिहायचे आणि रिफायनरी बारसूला करा, असे सांगायचे. मग स्वत:च चिथावणीखोर कृती करायची. यातून उद्धव ठाकरेंचा विकास विरोधी चेहरा पुढे आला आहे. त्यांना समाजाशी, विकासाशी काही एक लेनदेन नाही. विविध खांदे ते शोधतच असतात. आता बारसूचा खांदा त्यांना मिळाला आहे.
स्वतः पत्र लिहून पुन्हा विरोध करत असल्याबद्दल माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केले होते. लंगडे समर्थन करताना येथील नागरिकांना मान्य असेल तरच रिफायनरी होईल असे आपण म्हटले होते असे त्यांनी सांगितले.