शरद पवारांच्या खेळीने अजित पवारांच्या चलबिचल पणाला ब्रेक – संजय शिरसाट

२ मे रोजी शरद पवार यांचे आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा मान्य नसल्याची भूमिका घेत शरद पवार यांनी अध्यक्षपदी राहावे अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी एक निवड समिती नेमली होती समितीने निर्णय घ्यावा. अशी भूमिका घेतली होती त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या असून निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीच राहावे असा ठराव केला आहे. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार आणि अजित पवार यांना डिवचलं आहे.

आमदार संजय शिरसाठ म्हणाले, शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे. आता राष्ट्रवादीला नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र यावं लागणार आहे. शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की, शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात. हा पक्षातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना एक प्रकारे संदेश दिला असावा.

मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वतःकडे घ्यायची आहे.

शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली त्यावेळी सुप्रिया सुळे जेव्हा बोलत होत्या,तेव्हा अजित पवार यांनी त्यांना थांबवले.सुप्रिया तू गप्प बस म्हणून सांगितलं या सांगण्यामागे अनेक तर्क वितर्क काढल्या गेले. पण शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटावर परिणाम होणार आहे, या प्रकरणामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. यामुळे आता शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगेल.

वज्रमूठ सभा रद्द झाल्या. महाविकास आघाडीच्या सभेला मोठे नेते येणार नाहीत, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची यावरून सभा रद्द झाल्याचा टोलाही आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. याशिवाय संजय शिरसाठ यांनी अजित पवार यांनाही डिवचलं आहे.