वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट काल ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून बराच वाद सुरू होता, त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या चित्रपटातील ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचे दावे खोटे आहेत, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. या सर्व गदारोळात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एकीकडे सिनेप्रेमी या सिनेमाचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काही मंडळी या सिनेमावर टीका करत आहेत. पण तरीही रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 7.5 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या सिनेमाला बराच मोठा विरोध होत होता. त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका देखील कोर्टांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यावेळी केरळमधील ३२ हजारहून जास्त महिलांना आयएसआय मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा करणारा सिनेमाचा टीझर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून काढून टाकला जाणार असल्याचे आश्वासन निर्मात्याने उच्च न्यायालयाला दिले आहे.

चित्रपटातून 32,000 मळ्याळी महिलांचे धर्मांतर केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. केरळ राज्य सरकारनंही या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. सेन्सॉर बोर्डानंही या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. परंतु अद्यापही या चित्रपटाचा वाद कायम आहे.