महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार – नीतेश राणे

महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे. संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते. यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे. आता नीतेश राणेंच्या या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात बैठका सुरु आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर संजय राऊत पक्षात जाण्यासाठी तयार आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांची भूमिका काय होती, ते पाहा. राऊत हे त्यावेळी सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात बोलत होते. अजितदादांवर टीका करत होते. याचं कारण म्हणजे, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अट घातली होती की, अजित पवार यांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो. त्यामुळे संजय राऊत हे सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

नीतेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होईल. संजय राऊतने राष्ट्रवादीत असे कळवले आहे की सांगितले, आता उद्धव ठाकरेंकडे पक्ष नाही, त्यांचे काही खरे नाही, ते मला पुन्हा खासदार करु शकत नाही. मला राष्ट्रवादीत घ्या. उद्धव ठाकरेंबरोबर राहण्यात रस नाही. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे 4 वाजता संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील.