भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे 8 मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे.
हवामान विभागाचे महासंचलाकल मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे पर्यंत खाडीच्या दक्षिण-पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे जाईल.
मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा प्रशासन सतर्क झालं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात या आधी धडकलेल्या फनी वादळामुळे झालेल्या परिणामांचा संदर्भ देत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. उन्हाळ्यात चक्रीवादळाची दिशा निर्धारित करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, अशी वस्तुस्थितीही अधिकाऱ्यांनी मांडली. खबरदारी म्हणून किनारपट्टी आणि सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेता त्या दृष्टीने बचाव यंत्रना आधीच सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले आहेत.
मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसंच मच्छीमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहा असाही सावधानतेचा इशारा दिला आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
