राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे.

कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेस आता राहिलेच नाही. शशिकला जोल्ले वहिनी कर्नाटकात सगळ्यात जास्त लीडने निवडून येणार आहेत. सभेला झालेली गर्दी पाहिली असता वहिनी आज निवडून आल्या, असे जाहीर करतो. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मतदारसंघात काही लोक जातीयवादीपणा करत आहेत.

काँग्रेसचं तर डोकं फिरलं आहे. त्यांचे नेते म्हणाले हिंदू शब्द अश्लील आहे. तुमचा मेंदू सडला आहे म्हणून तो अश्लील वाटतो. पाकिस्तानात किती महागाई आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? मात्र, आपली अर्थव्यवस्था गतीने पुढे जात आहे. पाकिस्तानचा नेता कटोरा घेऊन निघाला आहे, पण कोणी त्यांना मदत करत नाहीत. या निवडणुकीत तुमच्या भाग्याचा प्रश्न आहे. मोदींनी दिलेल्या लसीमुळे आज सगळे जिवंत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.