वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी, सामनातून टीका

सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

दरम्यान नुकतचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आजच्या सामनातून पवारांवर टीका करण्यात आली आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले असा आरोप सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.

वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा.. सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.