गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातून मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचे दावे केले जात आहे. विशेष म्हणजे एकाच पक्षातही वेगवेगळ्या लोकांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मानले जात आहे. अनेकांचे तर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील लावण्यात आले होते. अशातच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल याचा फॉर्म्युला सांगितला आहे. कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा लोणारी समाजातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, आतापर्यंतची जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. ही आतापर्यंतची आपल्या लोकशाहीची परंपरा आहे. प्लॅन ‘बी’विषयी बोलायचे झाल्यास, ज्या पद्धतीने 2014 मध्ये काँग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आता आम्ही सतर्क आहोत. महाविकास आघाडीत ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील, ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा काँग्रेस सतर्क असेल, असे पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले म्हणाले, आज काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी ही भूमिका आहे की प्रत्येक ठिकाणी काँग्रेस उभा राहिला पाहिजे. काँग्रेसचे अस्तित्व दिसले पाहिजे. मात्र नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीची याबाबत अशी काही चर्चा अथवा बैठक झालेली नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे.
